आईस पत्र
कळत नाहीय प्रिय आई, माझी आई, मम्मा काय लिहू ? आई म्हणू कि नको कारण तो हक्क तू हिरावून घेतलायस. हे लिहिताना सुद्धा डोळे पाणवलेत माझे.
किती छान होतं ना आपल नातं. तुझ्याशिवाय कोणी नकोच होत मला. खूप जीव होता ना तुझा माझ्यावर! वय वर्ष ८, चौथीत होती मी तेव्हा तू घर सोडण्याचा निर्णय घेतलास. अचानक निघून गेलीस जाण्याआधी आठवतंय मला इतका बोलली होतीस कि चिऊ मी तुला सोबत नाही नेऊ शकत माझाच ठिकाणा नाही तुला कुठे ठेवणार. खूप रडले मी तू अशी अचानक गेलीस. त्या दिवशी काहीच कळत नव्हतं काय होतंय फक्त रडत राहिली तुझा नाव घेत. सगळे नातेवाईक आले सगळे मला झालेला किस्सा विचारत होते प्रत्येक वेळी लागलेली ती जखम पुन्हा कोणी ना कोणी छेडत होते त्यांना कळत नव्हतं माझ्यावर काय बेतत होत. माझ्या चेहऱ्या वरचा हास्य तेव्हाच कुठे हरपून गेलेलं. पप्पानी जीव लावला खूप काळजी घेतली पण आईची जागा कोणी घेऊ शकलय का? तुला माहितीय ना आजीचा स्वभाव तिने खूप त्रास दिला ग मला खूप त्रास, सहन होत नव्हत तरी सहन केल पप्पासाठी. कोणाशी बोलण्याची इचछा मेली एकटी राहू लागली. गुड्डू(लहान भाऊ ) आज्जी त्याचेच लाड करायची माझ मन कोणी जाणलं नाही. तुला माहितीय मी खूप चिडचिडी झाली एकटी राहते कोणीच नको असत सोबत. आयुष्यात असे किती क्षण आले जिथे तू हवी होतीस सगळ्यांची आई असते माझी असून सोबत का नाही ह्या प्रश्नाने मला पुरता वेड लावल होत.
शाळा संपली कॉलेज मध्ये गेले. असे खूप क्षण आले जेव्हा खूप एकटं वाटलं आयुष्य संपवावंसं वाटलं पण हिम्मत झाली नाही. एकटीच बाथरूम मध्ये लॉक करून रडत बसायचे. किती वेळा चक्कर येऊन पडलेय रस्त्यात, हिच्याशी कोण लग्न करणार कोण मिळणार हिला असे खूप टोमणे मी सहन केले. दिसायला सुंदर असून लग्न ठरत नव्हतं. रोज रात्री चादरीत तोंड दाबून किती हुंदके गिळले मलाच माहित नाही. तुझ्या बद्दल खूप लोकांनी खूप काही सांगितलं पण माझ मन मला सांगत तू जे केलस त्या मागे तुझे काही ठोस कारण असावे. मी तुला खूप शोधायचा प्रयत्न केला पण तू कुठेच दिसली नाहीस. एक दिवस फेसबुक वर तुझी लॉक प्रोफाईल दिसली त्या फोटोत तू आणि तुझी नवीन फॅमिली होती. कोणी विस्तव काळजावर ठेवावा असा चटका लागला ग. तुला मुलगी झाली म्हणून कदाचित तुला माझी आठवण नसेल येत मला येते ग. माझं सुखी परिवाराचं चित्र फाडलंस ग. एकदिवस सकाळी अचानक खूप हेवी वाटत होत रडत रडत मी चक्क्कर येऊन पडले. तेव्हा पहिल्यांदा मी थेरपी साठी डॉक्टर कडे गेले तेव्हा कळलं मला पॅनिक अटॅक येतात, माझी ट्रीटमेंट सुरु झाली खूप त्रासदायक होती पण मी ती घेतली. आयुष्याच्या अश्या वळणावर येऊन उभी आहे जिथे कोणीच नाहीय हात धरायला,थकलीय मी! पुढे काय माहित नाही पण तू सुखी राहा खूप प्रेम .
तुझीच - चिऊ